महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पिलेप्सी आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १७ नोव्हेंबर हा दिवस नॅशनल एपिलेप्सी अवेअरनेस दिन म्हणून साजरा केला जातो.
एपिलेप्सी हा मेंदूशी संबंधित आजार आहे. बोलीभाषेत याला मिरगी असे म्हणतात. यामुळे व्यक्तीला वारंवार झटके येऊ शकतात. भारतात अंदाजे १ कोटीहून अधिक लोक या आजाराने प्रभावित आहेत, याबद्दल अनेक चुकीच्या समजुती व अंधश्रद्धा समाजात प्रचलित आहेत.
एपिलेप्सीचा उपचार शक्य आहे आणि योग्य निदान व उपचारांद्वारे रुग्णांचे जीवन सामान्य होऊ शकते. आधुनिक औषधोपचार व सल्ल्यामुळे रुग्णांना त्यांच्या दैनंदिन जीवनाचा आनंद घेता येतो. एपिलेप्सी रुग्णांना समजून घेणे, त्यांना पाठिंबा देणे व समाजातील अंधश्रद्धा दूर करणे यासाठी हा दिन साजरा केला जातो.
या आजाराबद्दल माहिती देऊन , अंधश्रद्धा दूर करण्यासाठी भारती हॉस्पिटल येथे पीडियाट्रिक न्यूरोलॉजि विभागाच्या वतीने जनजागृती पथनाट्य, समवेदना फाऊंडेशनच्या यशोदा वाकणकर, भारती हॉस्पिटलचे डॉ. दुलारी गुप्ता, डॉ. अमृता वाळींबे, डॉ. निलेश कुरवळे यांनी एपिलेप्सी आजारा संदर्भातील औषधे, आहार, शस्त्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. कविता श्रीवास्तव, डॉ. प्रेरणा चौधरी यांनी पुढाकार घेतला.