मृतदेहाचे तुकडे करुन खडकवासला बॅकवॉटरमध्ये फेकले, तिघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मॉर्निग वॉकला गेलेल्या विठ्ठल पोळेकर यांना मामा चला, जरा तुमच्याकडे काम आहे, असे म्हणून त्यांना कारमध्ये बसविले आणि खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमधील ओसाडे गावाजवळ नेऊन त्यांचा खुन केला. अपहरण करुन चौघांनी त्यांचा तासाभरातच खुन केला. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते खडकवासला बॅक वॉटरमधील पाण्यात फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.
विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७०, रा. पोळेकरवाडी, डोणजे, ता. हवेली) असे खून झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मिलिंद देवीदास थोरात (वय २४, रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) आणि रोहित किसन भामे (वय २२, रा. डोणजे, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबु किसन भामे हा फरार आहे. योगेश भामे याच्यावर ९ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, अतिक्रमण, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे यांचा समावेश आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये आणि आता विधानसभा निवडणुकांची आचार संहिता लागल्यानंतर त्याच्यावर ११० नुसार कारवाई करण्यात येऊन बाँड घेण्यात आला होता, असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.
विठ्ठल पोळेकर हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी पायगुडे वाडी ते गोळेवाडी रस्त्याचे कामाचा ठेका घेतला होता. या कामात कोणताही अडथळा करु नये, म्हणून योगेश भामे याने त्यांच्याकडे खंडणी म्हणून एक कार मागितली होती. त्याची पुर्तता न केल्याने त्याने विठ्ठल पोळेकर व त्यांचा मुलगा प्रशांत पोळेकर यांचा खुन करण्याची धमकी दिली होती.
मॉर्निंग वॉकला गेलेले विठ्ठल पोळेकर हे परत न आल्याने अगोदर मिसिंग व त्यानंतर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोळेकर यांच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर ते गेल्यानंतर त्यांच्या मागोमाग एक स्विफ्ट कार जाताना दिसली.
ती गणेश मुरलीधर चोरमले यांची असून सध्या योगेश भामे वापरत असल्याची माहिती मिळाली. योगेश भामे हा घरी नसल्याने व त्याचा मोबाईल बंद असल्याने त्यानेच अपहरण केल्याचा संशय निर्माण झाला. त्याचा भाऊ रोहित भामे याला पोलिसांनी अटक केली.
या कारचा शोध घेतला असता ती नाशिकच्या दिशेने गेली असून योगेश भामे हा गाडी चालवत असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांचे सहकारी नाशिकला रवाना झाले. नाशिकमध्ये शोध घेतल्यावर संशयित आरोपी हे रेल्वेने जबलपूरकडे गेल्याचे समजले.
जबलपूर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने शुभम व मिलिंद यांना पकडण्यात आले, असे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, विठ्ठल पोळेकर यांचा शोध इकडे करण्यात येत होता. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितले की, दोघांना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली.
तेव्हा त्यांनी विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना बॅक वॉटरला नेऊन मारण्यात आले व त्यांचे अवयव पाण्यात टाकण्यात आले. आरोपींच्या सांगण्यावरुन शोध सुरु केला. त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संभाषण करुन माहिती घेतली. ड्रॉनद्वारे व नावेतून त्यांचा शोध घेतल्यानंतर विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे काही अवयव पोलिसांना मिळाले आहेत.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक अमोल बामणे, सागर पवार, पोलीस उपनिरीक्षक सुतनासे, पोलीस अंमलदार हनुमंत पासलकर, महेश बनकर, रामदास बाबर, राजू मोमीण, अतुल डेरे, दिपक साबळे, मंगेश थिगळे, संदीप वारे, अक्षय नवले, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, तुषार भोईटे, मंगेश भगत, अमोल शेडगे, काशिनाथ राजापुरे, दगडु वीरकर, संतोष भापकर, दिपक गायकवाड, संतोष तोडकर, गणेश धनवे, महेंद्र चौधरी, सचिन गुंड यांनी केली आहे.
तक्रारीची चौकशी करणार –
विधानसभा निवडणुका सुरु असताना ठेकेदाराचे अपहरण झाल्याचे समोर येताच, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी याबाबत तत्काळ तपासाचे आदेश दिले होते. त्यांनी घटनास्थळी भेट देखील दिली होती. दरम्यान, ठेकेदाराचा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला याचा पोलिस तपास करत असल्याचे फुलारी यांनी सांगितले. सुरुवातीला पोलिस स्टेशनमध्ये ठेकेदार बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.