पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात लग्नाला आल्यानंतर घरी परत जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना पीएमपी बसने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यु झाला तर मुलगी जखमी झाली आहे. आशाबाई दत्तात्रय सांळुके (वय ५७, रा. शुक्रवार पेठ, टिळक रोड) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत विशाल दत्तात्रय सांळुके (वय ३८, रा. शुक्रवार पेठ) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सतिश राजाराम गोरे (वय ३४, रा. राठवडे, कोंढणपूर) या बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील नातुबाग चौकात शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सर्व नातेवाईक मोरे यांच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. लग्न कार्यक्रम झाल्यानंतर रात्री ते सर्व जण घरी जाण्यासाठी निघाले. फिर्यादीची आई आशाबाई व मुलगी ही रिक्षाने बालाजीनगर येथे जाण्याकरीता रस्ता ओलांडत होत्या.
त्यावेळी स्वारगेटकडून येणारी एक पीएमपी बस बीआरटीमधून आली. कात्रजकडे भरधाव जाणाऱ्या बसने आशाबाई व फिर्यादींची मुलगी प्रचिती यांना धडक दिली. त्यात त्यांची आई आशाबाई सांळुके यांचा मृत्यु झाला तर मुलगी प्रचिती ही जखमी झाली आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख करीत आहेत.
