महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सध्याच्या वाढत्या ट्रॅफिक समस्यां आणि प्रदूषणाच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, जैन सोशल ग्रुप-युथ पुणे सेंट्रलने एक स्तुत्य उपक्रम राबवला. रविवार, 24 नोव्हेंबर रोजी, या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी पुणे मेट्रोचा वापर करून नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा संदेश दिला.
सकाळी सर्व सदस्य स्वारगेट मेट्रो स्थानकावर एकत्र जमले आणि बॅनर व पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांनी पुणे मेट्रोचा अधिकाधिक वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले, ज्यामुळे वेळ, पैसे आणि पर्यावरणाची बचत होऊ शकते.
स्वारगेट मेट्रो स्थानकापासून पी.सी.एम.सी मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करून, सर्व सदस्य पिंपरीतील वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. दर्शनानंतर नाश्ता करून पुन्हा मेट्रोने स्वारगेटकडे परतले.
प्रवासाच्या शेवटी, स्वारगेट मेट्रो स्टेशनवरील सुरक्षा नियंत्रण कक्षाचे संचालक मनोज यांना जनजागृतीसाठी वापरले जाणारे बॅनर हस्तांतरित करण्यात आले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि त्याचा उपयोग करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या उपक्रमाचे आयोजन ग्रुपचे मार्गदर्शक आणि माजी अध्यक्ष पवन भंडारी, प्रीतम भटेवरा, विद्यमान अध्यक्ष संदीप संकलेचा, वैभव कोठारी, पियूष बाफना, मयूर सिंघवी तसेच सर्व कमिटी सदस्य आणि ग्रुप सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले. हा उपक्रम पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक वाहतुकीच्या प्रचारासाठी एक आदर्श उदाहरण ठरला आहे.
