मांजरीतील घटनेत पाच जणांच्या खुनाचा प्रयत्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमनस्यातून रात्री उशीरापर्यंत पबजी गेम खेळत बसलेल्या पाच तरुणांवर टोळक्याने धारदार शस्त्राने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेत करण मेमजादे, सुजल भिसे, सुरज चौधरी, प्रतिक संजय शिंदे, तेजस ऊर्फ सोन्या पायगुडे हे जखमी झाले आहेत.
याबाबत करण मुकेश मेमजादे (वय २३, रा. गोडबोले वस्ती, कमल कॉलनी, मांजरी, ता. हवेली) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रेम निलेश साठे (वय १९, रा. गुरुकृपा सोसायटी, भोसले निवास, केशवनगर, मुंढवा), सौरभ आण्णा इंगळे (वय २३, रा. झेड कॉर्नर, मांजरी), स्वप्नील सयाजी कठोरे (वय २३, रा. गुरुकृपा सोसायटी, मुंढवा), सुमित सुजीत बर्नवाल (वय १९, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा), प्रतिक योगेश चोरडे (वय २१, रा. हरीओम कॉलनी, केशवनगर, मुंढवा) यांना अटक करण्यात आली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
हा प्रकार मांजरीतील मॉल झेड कॉर्नर येथे रविवारी रात्री साडेदहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे मित्र पबजी गेम खेळत होते. यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरुन आरोपी तेथे आले.
त्यांनी फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन हाताने तसेच धारदार हत्याराने मारहाण केली. फियार्दीचे मित्र सुजल भिसे, सुरज चौधरी, प्रतिक संजय शिंदे, रस्त्यावर उभा असणारा तेजस ऊर्फ सोन्या पायगुडे यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले.
तसेच सार्वजनिक रस्त्यावर हातातील हत्यारे हवेत फिरवून दहशत निर्माण केली. पोलिसांनी ६ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.
