नर्हे येथील मानाजीनगरमधील पहाटेची घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गाडीतील पेट्रोल संपल्याने दुसर्या गाडीतील पेट्रोल काढत असताना तरुणाला चोर समजून बेदम मारहाण करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नर्हे येथील मानाजीनगरमधील गणपती मंदिराजवळ मंगळवारी पहाटे ६ वाजता घडला. या घटनेत समर्थ नेताजी भगत (वय २०) हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत त्याचे वडिल नेताजी सोपान भगत (वय ५१, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव कॉलेज रोड, नर्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गौरव संजय कुटे व इतर दोन ते तीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा समर्थ भगत याला पहाटे बाहेर जायचे होते. परंतु, त्याच्या गाडीतील पेट्रोल संपले होते. तेव्हा त्याने दुसर्या गाडीतील पेट्रोल काढून आपल्या गाडीत ते तो भरणार होता.
तो पेट्रोल काढत असताना पेट्रोल चोर समजून तेथील लोकांनी समर्थ याला लाथाबुक्क्यांनी, काठीने तसेच सायकलचे चैनने दोन्ही हातावर,पार्श्वभागावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
