वाहतूक शाखेकडील ई-चलान मशीनमध्ये स्वतंत्र हेड खाली होणार कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर (सह प्रवासी) यांचे अपघात व मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
त्याबाबतचे पत्र नुकतेच सर्वांना पाठविण्यात आले आहे. आता सहप्रवाशांना स्वतंत्र हेड खाली कारवाई होणार असून त्यासाठी ई-चालान मशीनमध्ये बदल करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या तरी पुणे शहरातील दुचाकीवरील सह प्रवाशांवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
राज्यात सर्व मोठ्या शहरांमध्ये दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याविषयी रोष व्यक्त केला जातो. असे असले तरी सध्या वाहतूक पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून विनाहेल्मेट दुचाकीस्वारावर कारवाई करत असतात. सध्या तरी राज्यात दुचाकीवरील पिलियन रायडर (सहप्रवासी) यांच्यावर कारवाई केली जात नाही.
त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी ई चालान मशीनमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. अपर पोलीस महासंचालक यांनी सर्वांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील मागील ५ वषार्तील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता असे दिसून येते की विना हेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांचे अपघात, मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
तसेच सेक्शन १२८ आणि १२९ मोटार वाहन कायदा १९८८ कायद्यातील तरतुदीप्रमाणे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर यांचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस घटकांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती संबंधित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात यावी.
प्रभावीपणे व कडक अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच वाहतूक केसेस करीता वापरण्यात येणाऱ्या ई चालान मशीनमध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार व विना हेल्मेट पिलीयन रायडर या दोन्ही केसेसची कारवाई या एकाच हेडखाली आल्याने विना हेल्मेट रायडर व विना हेल्मेट पिलीयन रायडर यांची वेगवेगळी माहिती मिळत नव्हती.
तरी ई चालान मशीनमध्ये सेक्शन १२९/१९४ (ड) एमव्ही ए शिर्षकामध्ये बदल करण्यात येत असून या पुढील कारवाई ही १) विना हेल्मेट रायडर २) विना हेल्मेट पिलीयन रायडर (सह प्रवासी) अशा दोन वेगवेगळ्या हेडखाली कडक व प्रभावीपणे करण्यात यावी.
जेणेकरुन दुचाकीस्वार चालक व सह प्रवासी यांचे अपघात, मृत्युमुखी व जखमींची संख्या निश्चितच कमी होण्यास मदत होईल, असे या पत्रात म्हटले आहे. सध्या विनाहेल्मेट वाहनचालकांवरच सी सी टी व्ही मार्फत कारवाई केली जात आहे. पुणे शहरात दररोज अशा प्रकारे जवळपास ४ हजार चालकांवर कारवाई केली जाते.
