कामाच्या शोधात पुण्यात दाखल; बेकायदेशीर प्रवेशामुळे गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गलोरहून रेल्वेने थेट पुण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुसलामिया अब्दुल अजिज प्यादा (वय २७, रा. पश्चिम कोलागासिया, थाना आमतुली, जि. बोरगुना, बुलिशाखाली, बांगलादेश) असे तिचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार भाग्यश्री सागर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसलामिया ही बांगलादेशाची नागरिक असून, ती मंगळवारी बंगलोरहून रेल्वेने पुण्यात आली. पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ च्या बाहेर रिक्षा स्टँडजवळ ती बराच वेळ बसून होती. बांगली भाषेशिवाय इतर कोणतीही भाषा तिला समजत नव्हती. तिच्या संशयास्पद हालचालींमुळे नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
दामिनी पथकातील महिला पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणले. दुभाषाच्या मदतीने चौकशीदरम्यान तिने सांगितले की, ती आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
नोकरीच्या शोधात ती बांगलादेशातून कोलकात्यात आली, जिथे तिला बनावट कागदपत्रे तयार करून देण्यात आली. या कागदपत्रांच्या आधारावर ती विमानाने बंगलोरला पोहोचली. मात्र, तिथे काम न मिळाल्याने पुण्यात काम शोधण्यासाठी ती आली.
मुसलामिया हिने भारतात कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय तसेच सीमा अधिकाऱ्यांची परवानगी न घेता प्रवेश केला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मुजावर या प्रकरणाचा तपास करत आहेत.