येरवड्यातील घटना : प्रियकराला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणेः भुलथापा देऊन प्रेमात पाडल्यानंतर प्रियकराने मानसिक त्रास दिल्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवड्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी केविन चंदेवळ (वय १८, रा. येरवडा) याला ताब्यात घेतले आहे. ही घटना येरवड्यातील भाजी मार्केट परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. मुलीच्या वडिलांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या १७ वर्षीय मुलीला केविन चंदेवळ याने भुलथापा देत प्रेमसंबंधात अडकवले. परंतु, नंतर त्याने तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सततच्या त्रासामुळे पीडितेचे मानसिक संतुलन बिघडले.
या मानसिक तणावामुळे तिने सोमवारी रात्री राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे निरीक्षक स्वाती खेडकर आणि सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके यांनी घटनास्थळी भेट दिली.
येरवडा पोलीस स्टेशनमध्ये केविन चंदेवळ विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या गुन्हे निरीक्षक स्वाती खेडकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.