ज्येष्ठ सराफ व्यवसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवत चेहर्यावर मारला स्प्रे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दुकान बंद करण्यापूर्वी दिवसभराचा हिशोब लिहित असताना दुकानात शिरलेल्या दोघा चोरट्यांनी सराफ व्यावसायिकाच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. पिस्तुलाचा धाक दाखवून अडीच लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले.
याबाबत वालचंद ओसवाल (वय ७७, रा. नाना पेठ) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील बोराटे वस्तीमधील अरिहंत ज्वेलर्स या दुकानात रविवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे अरिहंत ज्वेलर्स नावाने सराफी दुकान बी टी कवडे रोडवर आहे. ते रविवारी रात्री दुकानात बसून दिवसभराचा हिशोब वहीत लिहीत बसले होते.
साधारण रात्री साडेनऊ च्या सुमारास दोन चोरटे दुकानात शिरले. त्यांच्यातील एकाने दुकानाचे शटर अर्धवट ओढले. त्यातील एकाने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. दुसरा चोरटा सोन्याचे दागिने घेऊ लागला. तेव्हा ओसवाल यांनी त्यांना विरोध केला.
त्यावर त्याने कंबरेचे लोखंडी हत्यार काढून ‘चुप बैठो’ असे म्हणत, त्यांच्या डाव्या खांद्यावर मारले. ते दोघे हाताला लागतील ते दागिने घेऊन पळून गेले. चोरट्यांनी ६ सोन्याचे चमकी पान, १० सोन्याचे गलसन, ६ सोन्याचे डोरले वाटी असा २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, निखिल पिंगळे, राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त आश्विनी राख, प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, काळगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. हा तपास पोलीस उपनिरीक्षक भिमराव मांजरे करीत आहेत.
