चोरट्याकडून रिक्षा, मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड, समर्थ पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नरपतगिरी चौकाजवळ हॉटेल राजधानीसमोर रिक्षा पार्क केली गेली. अनेक दिवस ही रिक्षा जागेवरच असल्याचे पाहून चोरट्याने ती चोरुन नेली. समर्थ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून ते चोरट्यापर्यंत पोहचले. चोरट्याकडून ही रिक्षा जप्त तर केली़ त्याबरोबरआणखी एक रिक्षा आणि एक मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आनंद ऊर्फ अक्षय प्रल्हाद साळुंखे (वय २३, रा. मानकाईनगर, आव्हाळवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत विजयशंकर रामअधार पाठक (वय ७०, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यांचे जावई प्रदिपकुमार उपाध्याय हे ही रिक्षा चालवितात. ते एक महिन्यांपासून मुंबईला गेले.
तेव्हापासून रिक्षा त्यांनी सोसायटीसमोरील सार्वजनिक जागेत पार्क केली होती. ते रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना रिक्षा पहात होते. बरेच दिवस रिक्षा जागेवर असल्याचे पाहून चोरट्याने मध्यरात्रीनंतर कधीही रिक्षा चोरुन नेली.
२८ नोव्हेबर रोजी पहाटे ते मॉर्निग वॉकला बाहेर पडले, तेव्हा रिक्षा जागेवर नव्हती. त्यांनी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये रिक्षा चोरीची फिर्याद दिली. समर्थ पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले. त्यात एक जण रिक्षा घेऊन जाताना दिसून आला.
तसेच बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंद साळुंखे याला अटक केली. त्यांच्याकडून चोरलेली रिक्षा जप्त केली. अधिक तपासात चतु:श्रृगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेली रिक्षा आणि हडपसर परिसरातून चोरीला गेलेली मोटरसायकल असे तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सहायक फौजदार संतोष पागार, पोलीस अंमलदार इम्रान शेख, रवींद्र अैचारे शिवा कांबळे, अमोल गावडे, रहीम शेख, शरद घोरपडे, कल्याण बोराडे यांनी केली आहे.
