गुन्हे शाखेने तिघांना घेतले ताब्यात : शेजार्याच्या वैयक्तिक वादातून खून
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून वैयक्तिक कारणावरुन झाला असून त्यासाठी ५ लाख रूपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी पाच आरोपींपैकी तिघांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास फुरसुंगी फाटा येऊन अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. लाकडी दांडक्याने मारहाण करुन गळा दाबून त्यांचा खून करण्यात आला होता.
याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्याने वैयक्तिक वादातून सतीश वाघ यांची ५ लाख रुपयांची सुपारी दिली होती.
त्यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा गुन्हेगारी कट रचून खून करण्यात आला असल्याने या गुन्ह्यात १२० ब हे कलम वाढविण्यात आले आहे.
अपहरणाची घटना समजल्यानंतर गुन्हे शाखा व हडपसर पोलिसांसह सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी तपासाला सुरुवात केली होती.गुन्हे शाखेकडे गुन्हा हस्तांतरीत तपासादरम्यान, ४५० सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले गेले.त्यातून ज्या गाडीतून अपहरण करण्यात आले होते, तिचा शोध घेण्यात आला. त्यातून काल दोघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
५ लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून करण्यात आला आहे. काही विरोधक पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत होते. परंतु, हा गुन्हा वैयक्तिक वादातून घडला आहे. असे गुन्हे टाळता येऊ शकत नाही.
पुणे पोलिसांनी अत्यंत कार्यक्षमतेने, मेहनत घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. पुणे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राबविण्यात नेहमीच सुसज्ज आहेत. आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने भक्कम पुरावे गोळा केले जातील, असे अमितेशकुमार यांनी सांगितले.
