बोपखेल फाट्यावर चोरट्यांचा थरार : ४ लाखांचा ऐवज लंपास
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लग्नात दागिने घालून मिरविले. त्यानंतर रात्री घरी जाताना चोरटे गळ्यातील दागिने हिसकावितात, म्हणून त्यांनी गळ्यातील मोहनमाळ, मंगळसुत्र काढून कापडी पिशवीत ठेवले. पतीबरोबर दुचाकीवरुन जात असताना चोरट्यांनी त्यांना एकटे गाठून पिशवी हिसकाविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिकार केला. तेव्हा चोरट्याने त्यांना खाली पाडून पिशवी चोरुन नेली. बँगेत ४ लाख १० हजार रुपयांचा ऐवज होता.
हा प्रकार आंळदी रोडवर बोपखेल फाटाच्या पुढे १६ डिसेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजता घडला. फिर्यादी यांच्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी त्यांच्या हातातील पिशवी चोरुन नेल्याचा संशय आहे.
याबाबत धानोरीत राहणार्या ५० वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या त्यांचे पतीसह नातेवाईकांच्या लग्नाला सोमवारी सायंकाळी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मोहनमाळ व मंगळसुत्र बॅगमध्ये घेऊन गेले होते. लग्नामध्ये मंगळसुत्र, मोहनमाळ घालून त्या वावरत होत्या. लग्न, जेवण करुन त्यानंतर त्यांनी मोहनमाळ, मंगळसुत्र पुन्हा काढून कापडी बॅगमध्ये ठेवले.
त्या पतीसह दुचाकीवरुन दिघी वरुन आळंदी रोडने घरी जात होते. बोपखेल फाटाच्या पुढे रस्ता अरुंद असल्याने त्यांनी दुचाकी हळू केली. तेव्हा पाठीमागून मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातात धरलेली बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या पतीने दुचाकी थांबविली.
त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. मोटारसायकलवरील चोरटे खाली उतरुन त्यांच्याकडे आले. त्यांनी बँग घट्ट धरुन ठेवली असताना त्यांना खाली पाडून त्यांच्याकडील ४ लाख १० हजार रुपयांचे १० तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून चोरटे पळून गेले. विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.















