खून करणाऱ्या आरोपीला मोहोळ पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर – (मोहळ) : मोहोळ तालुक्यात एक निघृण गुन्हा उघडकीस आला आहे. कृष्णा नारायण चामे (वय ५२ वर्षे, रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ) यांच्या अपहरणाचा बनाव रचून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कृष्णा चामे यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार मोहोळ पोलिस ठाण्यात १५ डिसेंबर २०२४ रोजी दाखल झाली. प्रारंभी बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शेजारील जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांशी संपर्क साधला. कृष्णा चामे यांचा मोबाईल घरी सापडल्याने सीडीआरच्या आधारे चौकशी करण्यात आली. मात्र, कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.
१७ डिसेंबर रोजी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले गेले, परंतु कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत. स्थानिक नदी, नाले, विहिरी आणि जंगल परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. तरीही अपहृत व्यक्तीचा ठावठिकाणा लागला नाही.
शोध मोहिमेदरम्यान कृष्णा चामे यांच्याच शेतात काम करणाऱ्या सालगडी सचिन गिरी याच्या वागण्यात विसंगती आढळून आली. त्याची सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आर्थिक कारणांमुळे आणि सोन्याच्या लोभासाठी त्याने ही हत्या केल्याचे सांगितले.
सचिन गिरीने प्रथम कृष्णा चामे यांच्या डोक्यात हातोड्याने वार केले. त्यानंतर धारदार हत्याराने शरीराचे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉलिथीन बॅगमध्ये भरून शौचालयाच्या शोषखड्ड्यात टाकले. मृताच्या अंगावरील १८ ते १९ तोळे सोन्याचे दागिनेही चोरून ते घरासमोरील खड्ड्यात पुरल्याचे त्याने कबूल केले.
सचिन गिरी याच्यावर यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील अंबी पोलिस ठाण्यात तीन चोरीचे गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
या कामगिरीत मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने, सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड, आणि डीवायएसपी कार्यालयातील सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे आणि त्यांच्या पथकातील अनेक कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
