महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
यासाठी पूर्व प्राथमिक विभागासाठी आकांक्षा दत्ता (प्रोफेशनल स्टोरीटेलर आणि बुक ब्लॉगर), प्राथमिक विभागासाठी इंद्रदीप नंदा (हेड, टाइम्स ऑफ इंडिया एन. आय. ई.), आणि माध्यमिक विभागासाठी इंद्र जैन (चेअरमन, जे. आय. टी. ओ. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशन), इंद्रकुमार छाजेड (अध्यक्ष : जीतो पुणे) प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते.
शाळेचे चेअरमन सुभाष परमार, खजिनदार सुरेशजी परमार, आणि सेक्रेटरी पुखराज संघवी हेही उपस्थित होते. शाळेच्या परंपरेनुसार, विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी “भारतीय संस्कृती वारसा व सामाजिक संदेश” या संकल्पनेवर आधारित नृत्य, गायन, आणि नाटकाद्वारे विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने ‘प्राईड ऑफ आचार्य श्री विजय वल्लभ विद्यार्थी पुरस्कार’ माजी विद्यार्थी किशोर जैन आणि माजी विद्यार्थिनी प्राजक्ता ओरपे यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ‘संगीत उत्कृष्टता’ पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांनाही रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
वार्षिक परीक्षा २०२३ मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे व गुणवत्तेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विमल परदेशी यांनी केले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका अॅनी स्वामीकन आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम शाळेचे चेअरमन सुभाष परमार, पूर्व प्राथमिक समन्विका भाविका राठोड, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्नेहल खटावकर, आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विमल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.
