दारूच्या नशेत रॉंग साइडने रिक्षा चालवून कॅबला दिली धडक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारूच्या नशेत रॉंग साइडने रिक्षा चालवून कॅबला धडक दिल्यानंतर रिक्षा उलटल्याने झालेल्या अपघातात रिक्षा प्रवाशाचा मृत्यू झाला.
धरमवीर राधेश्याम सिंग (वय ३८, रा. श्रीनगर, वडगाव शेरी) असे मृत्यू पावलेल्या रिक्षा प्रवाशाचे नाव आहे. याबाबत कॅब चालक पराग सुनिल शर्मा (वय २८, रा. हॅप्पी इस्टेट, चंदननगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी जॉन राजू स्वामी (वय ३१, रा. मुळीक कॉम्प्लेक्स, वडगाव शेरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नगर-पुणे रोडवर आगाखान पॅलेससमोर रविवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, जॉन स्वामी यांनी दारू पिऊन नशेत प्रवाशांना घेऊन वडगाव शेरीहून रॉंग साइडने भरधाव रिक्षा चालवली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कॅबच्या डाव्या बाजूस धडक दिली.
त्यानंतर रिक्षा कॅबच्या मागे जाऊन पलटी झाली. या अपघातामुळे फिर्यादीच्या गाडीच्या समोरील डाव्या बाजूचा बंपर, हेडलाईट चेंबून तुटून नुकसान झाले. त्याचवेळी रिक्षा पलटी झाल्याने आतील प्रवासी धरमवीर राधेश्याम सिंग यांचा मृत्यू झाला.
