बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात
महाराष्ट्र नुज नेटवर्क
पुणे : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार घोषित केलेल्या तिघांपैकी दोघांना पकडण्यात बीडच्या विशेष तपास पथकाला मोठे यश आले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे सुदर्शन चंद्रभान घुले (वय २६, रा. टाकळी, ता. केज) आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे (वय २३, रा. टाकळी, ता. केज) अशी आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्याच्या अधिवेशनातही मोठी खळबळ उडवली होती. हत्येनंतर आरोपी फरार झाले होते. बीड पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते.
त्यामुळे राज्य शासनाने प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला होता. सीआयडीच्या तपासादरम्यान वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीच्या कार्यालयात स्वतःहून शरण आला. त्याच्या जबाबावरून आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे बीडच्या विशेष तपास पथकाने तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून, पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतले.
या आरोपींना पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) बीड पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बीड विशेष तपास पथकाच्या यशामुळे प्रकरणाच्या तपासाला वेग मिळेल अशी अपेक्षा आहे.
