महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दुचाकी वाहनाची खरेदी केल्यानंतर वाहन वितरकाने खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. या निर्णयाची वितरकाने काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असून हेल्मेट न दिल्यास संबंधित वाहन वितरकावर कारवाई केली जाणार आहे. शिवाय वितरकांकडून हेल्मेट देताना जास्तीचे पैसे आकारु नये, असा आदेश परिवहन विभागाकडून काढण्यात आला आहे.
दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. यामध्ये दुचाकी चालकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दुचाकी वाहन खरेदी केल्यानंतर संबंधित खरेदीदाराला दोन हेल्मेट देण्याबाबत मोटर वाहन कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. शिवाय वाहनचालकाला हेल्मेट न दिल्यास कारवाई करण्याचीही तरतूद केली आहे.
तसेच राज्यातील वाढत्या अपघातांची संख्या पाहता न्यायालयानेदेखील याबाबत आदेश दिलेले आहेत. दुचाकीस्वाराला झालेल्या अपघातात बहुतांशवेळा डोक्यावर हेल्मेट नसल्याने जीव गमवावा लागतो. अशा प्रकारच्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे न्यायालयाने चिंता व्यक्त केली असून, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेट सक्ती करण्याचे सूचित केलेले आहे.
यामुळे राज्य परिवहन विभागाने खबरदारी घेत यापूर्वीच दुचाकी उत्पादक आणि विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच, याबाबत राज्यातील सर्व आर.टी.ओ. कार्यालयांना पत्राव्दारे कळविण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आता पुणे आर.टी.ओ. कार्यालयाने देखील याबाबत पत्र काढले असून सर्व वाहन वितरकांना आदेश दिले आहेत.
त्यानुसार दुचाकी वाहन खरेदीदाराला दोन हेल्मेट द्यावे, असे यामध्ये म्हंटले आहे. विक्रेत्यांनी हेल्मेट न दिल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.
तर विक्रेत्याचे ट्रेड सर्टिफिकेट रद्द केले जाईल
वाहन विक्रेत्याने दुचाकी खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्याला जास्तीची रक्कमदेखील आकारता येणार नाही. अशा पद्धतीने हेल्मेट न दिल्यास संबंधित विक्रेत्याचे ट्रेड सर्टिफिकेट रद्द केले जाईल, असे आरटीओकडून सांगण्यात आले.
