बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रस्त्यावर सुरू असलेली मारामारी पाहत असताना मारामारी करणाऱ्या मुलांपैकी एकाने तरुणाला मारहाण करून त्याचा मोबाईल चोरून नेला होता. बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या माहितीच्या आधारे एका युवकाला पकडले. त्याच्याकडून तब्बल १० चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तन्मय पृथ्वीराज भैसडे (वय १९, रा. प्रियदर्शनी चाळ, राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत संदीप राठोड (वय २४, रा. आनंदनगर सोसायटी, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. फिर्यादी २७ डिसेंबर रोजी सायंकाळी घरी जात होते. चामुंडा स्वीटकडे जात असताना, भूत बंगल्याजवळ चार मुले एका मुलाला मारहाण करत होती.
ते पाहून फिर्यादी थांबले असता, त्या मुलांपैकी एकाने संदीप राठोड यांना धरून हाताने मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. जमिनीवरील दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. डोक्यातून रक्त आल्याने घाबरून तेथून पळून गेले.
या गुन्ह्याचा तपास करताना तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले व विवेक मिसाळ यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलचे सीडीआर तपासले. पोलीस अंमलदार विशाल जाधव व आशिष गायकवाड यांना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तन्मय भैसडे याला अटक केली.
चौकशीदरम्यान, त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल अडीच लाख रुपये किमतीचे १० महागडे मोबाईल जप्त करण्यात आले. या मोबाईलच्या सहाय्याने बिबवेवाडी पोलीस स्टेशनमधील जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
या कारवाईत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे व सहय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक विवेक मिसाळ, अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अंमलदार विशाल जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, नितीन धोत्रे, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, प्रणय पाटील व अजय कामटे यांनी केली आहे.
















