पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता संकल्पना योग्य : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्राची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉन’ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हॉटेल जे. डब्ल्यू. मेरियट येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नाविन्यपूर्ण आणि भविष्यवेधी संकल्पनेची निवड केल्याबद्दल राज्यपालांनी प्रशंसा करत म्हटले की, आज ‘एआय’ ही माध्यमांसह विविध क्षेत्रांत परिवर्तन घडवत असताना ही निवड योग्य आणि महत्त्वपूर्ण आहे.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, “पत्रकार हा समाजाचा दिशादर्शक असून बातम्या सत्य आणि निष्पक्षपणे पोहोचविणाऱ्या पत्रकारांमुळे लोकशाही अधिक सशक्त होते. एआय माध्यमांची भूमिका निभावले, तरी पत्रकारांची सत्यशोधन भूमिका कायम राहायला हवी.”
त्यांनी पुढे सांगितले की, बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकारितेचा पाया घातला. त्यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन महाराष्ट्र पत्रकारिता अधिक समृद्ध झाली आहे.
राज्यपालांनी सांगितले की, एआयसह तंत्रज्ञानाचा विकास होतो आहे. यामुळे माध्यम क्षेत्रात मोठे बदल होत असले तरी सत्यता आणि प्रामाणिकता टिकवणे महत्त्वाचे आहे. त्यांनी हॅकेथॉनमध्ये सहभागी तरुणांना सत्य पोहोचविण्याच्या तंत्रांचे ज्ञान आत्मसात करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमात ‘संपादक व्रतस्त पुरस्कार’ पुढारी समूहाच्या संपादक स्मिता योगेश जाधव, दैनिक लोकमतचे यदू जोशी, दै. सकाळच्या शीतल पवार, न्यूज १८ लोकमतचे विलास बढे यांना प्रदान करण्यात आले. विशेष पुरस्कार रुपेरी किनारच्या कल्पना जावडेकर आणि एड्यूटेकचे निलेश खेडेकर यांना देण्यात आले.
हॅकेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला पत्रकार, पत्रकारिता अभ्यासक्रमातील विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
