बिबवेवाडी, विश्रांतवाडीत पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कृत्रिम मांजामुळे दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने शासनाने चायनीज मांजावर बंदी घातली आहे. असे असतानाही, या मांजाची विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नायलॉन किंवा चायनीज मांजामुळे अनेक दुचाकीस्वारांच्या गळ्याला गंभीर दुखापती होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. संक्रांतीचे दिवस जवळ येत असल्याने पतंग उडवण्यास सुरुवात झाली आहे. याच काळात काही जण चायनीज मांजाचा वापर करताना आढळून येतात. त्यामुळे पोलिसांकडून बंदी असलेल्या चायनीज मांजाची विक्री करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार सुमित उत्तरेश्वर ताकपेरे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पृथ्वीराज राजेश म्हस्के (वय २३, रा. सिद्धार्थनगर, अप्पर बिबवेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यावरण विभागाने प्लॅस्टिक, नायलॉन व सिंथेटिक मांजामुळे पक्षी व मनुष्य यांना होणाऱ्या जखमांपासून संरक्षण मिळावे, यासाठी अशा मांजाच्या विक्री, वापर व साठवणुकीस मनाई केली आहे.
पुणे शहर पोलिसांनी याबाबत वेळोवेळी आदेश काढले आहेत. तरीही पृथ्वीराज म्हस्के यांच्या लोकशाहीर आण्णासाहेब साठेनगर येथील दुकानात विविध रंगांचे प्लॅस्टिक, नायलॉन, सिंथेटिक मांजाचे ५० रिळ विक्रीसाठी साठवून ठेवलेले आढळले. पोलिसांनी १० हजार रुपयांचा मांजा जप्त केला असून म्हस्के याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आग्रे करत आहेत.
दुसरी कारवाई धानोरी येथे करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ४ मधील पोलीस अंमलदार नागेशसिंग रुपबहादुर कुंवर यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी नसीम अल्ताफ शेख (वय ५०, रा. मैत्री पार्क कॉलनी, मुंजाबा वस्ती, धानोरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नसीम शेख यांनी त्यांच्या राहत्या घरासमोर कृत्रिम लेप लावलेला, विविध रंगांचा नायलॉन मांजा विक्रीसाठी बाळगला होता. पोलिसांनी दोन फिरक्या जप्त केल्या असून पुढील तपास पोलीस हवालदार केंद्रे करत आहेत.

 
			

















