पिकअप पॉईंट शोधून होणार कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: मुंबई-पुणे प्रवासासाठी ब्ला ब्ला ॲपचा वापर करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या ॲपच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात असून, हे ॲप आणि त्याचा वापर करणारे कार चालक आता पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) रडारवर आले आहेत. पुणे RTO मार्फत त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.
एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई-पुणे मार्गावर कार पूलिंग करून खर्च वाचवण्याची सुविधा ब्ला ब्ला ॲपने दिली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये रोजच्या प्रवाशांना यामुळे मोठी सोय झाली होती. इंधन आणि पैशांची बचत होत असल्याने अल्पावधीत हे ॲप लोकप्रिय झाले.
पुणे RTO ने ब्ला ब्ला कारचे पिकअप पॉईंट शोधून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. खोटे प्रवासी म्हणून नोंदणी करून प्रवास करून संबंधित चालकांवर कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. रस्ता सुरक्षा पथक नवले पूल, चांदणी चौक, स्वारगेट, पुणे स्टेशन यांसारख्या ठिकाणी तैनात असणार आहेत.
इतर अशाच प्रकारच्या ॲप्सद्वारे बुकिंग केलेल्या खाजगी वाहनांची तपासणी केली जाईल. या वाहनांवर ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असिस्टंट रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर विनायक साखरे म्हणाले, “ब्ला ब्ला ॲप आणि तत्सम ॲपद्वारे प्रवासी वाहतूक करणे अवैध आहे. या ॲप्सचे पिकअप पॉईंट शोधून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तक्रारीनुसार पुढील पावले उचलली जातील.”