पतीशी झालेल्या भांडणानंतर महिला आत्महत्येच्या प्रयत्नात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पतीसोबत झालेल्या भांडणामुळे नैराश्यात गेलेल्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला; परंतु दामिनी मार्शलच्या तात्काळ कोऑर्डिनेशनमुळे तिचे प्राण वाचले. ही घटना बुधवार, दुपारी १२:४० वाजता घडली. शिवाजीनगर दामिनी मार्शलना एका महिलेचा फोन आला, “मी आत्महत्या करीत आहे,” असे सांगून महिलेने फोन बंद केला.
शिवाजीनगरच्या दामिनी मार्शल यांनी तातडीने ही माहिती भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांना दिली. त्यांनी महिलेचे लोकेशन शोधून काढण्याचे आदेश दिले. प्रथम लोकेशन मार्केटयार्ड परिसरात असल्याचे समजले, त्यामुळे मार्केटयार्ड दामिनी मार्शलला तत्काळ त्या ठिकाणी पाठविण्यात आले.
काही वेळानंतर लोकेशन पर्वती पायथ्याला असल्याचे दिसले. पर्वती दामिनी मार्शल यांनी तिथे शोध घेतला असता, संबंधित महिला सापडली. दामिनी मार्शल यांनी एकमेकींशी योग्य समन्वय साधत केलेल्या चोख कामगिरीमुळे आत्महत्येचा विचार मनात असलेल्या महिलेचे प्राण वाचविण्यात आले.
या कामगिरीत पर्वती दामिनी मार्शल सपकाळ, पर्वती दर्शन मार्शल भरगुडे व ठाकरे, जनता मार्शल पोलीस अंमलदार चव्हाण व मंडलिक, स्वारगेट दामिनी मार्शल धायतडक, मार्केटयार्ड दामिनी मार्शल घाडगे, आणि शिवाजीनगर दामिनी मार्शल हिंगे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
महिलेला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिच्या पतीला बोलावून समुपदेशन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी महिलेसोबत तिच्या पतीचे समुपदेशन करून योग्य मार्गदर्शन केले. नंतर महिलेची मामा-मामी व इतर नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आली.
ही कामगिरी भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बागुल आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.