महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोंढवा बुद्रुक येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित प्रतिभाताई पवार प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ साळवे गार्डन मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.
समारंभाचे प्रमुख पाहुणे कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, ग्रामीण जीवनावरील आणि हिंदी, मराठी तसेच तेलुगू चित्रपटांच्या गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
क्रीडा स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक पाटणकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि शाळेच्या शिक्षकांच्या परिश्रमांचे कौतुक केले.
संस्थापक-अध्यक्ष जालींदर कामठे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी कला व क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करून शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमात वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालींदर कामठे, कामगार नेते बजरंग वाघ, शिवाजी मरळ, शिरीष धर्मावत, मुख्याध्यापिका सुरेखा कोलते यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भानुदास रिठे यांनी केले, तर सूत्रसंचालन शंकर बांगर व सपना कबाडी यांनी केले. आभार प्रदर्शन रामचंद्र वसेकर यांनी केले.