धाराशिव येथे आक्रोश मोर्चा: भूममधूनही मोठ्या संख्येने सहभागाचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी तातडीने मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भूम येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला विविध राजकीय पक्षांचे नेते, सरपंच परिषद सदस्य, आणि १८ पगड जाती-धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी हत्याकांडावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी असून, समाजात गुंडशाहीचे समर्थन सहन केले जाणार नाही,” असे स्पष्ट करत दडपशाहीविरोधात आवाज उठवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
धाराशिव येथे ११ जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, भूम, परंडा, वाशी तालुक्यांतील सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, युवक, महिला, आणि सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले.















