पणनमंत्री ना. जयकुमार रावल: मार्केटिंगकडे लक्ष देण्याची गरज
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बदलत्या जीवनशैलीत तृणधान्ये ही आहाराचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे ग्राहकांचा त्याकडे वाढता कल दिसून येतो. त्यामुळे उत्पादनवाढीसोबतच नाविन्यपूर्ण विक्री आणि मार्केटिंग तंत्रांचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पणनमंत्री ना. जयकुमार रावल यांनी केले.
गणेश कला क्रीडा मंडळ येथे आयोजित दुसऱ्या मिलेट महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषी पणन मंडळाचे संचालक विकास रसाळ, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, सिंदखेडा बाजार समितीचे सभापती व मंडळाचे माजी संचालक नारायण पाटील आदी उपस्थित होते.
ना. रावल म्हणाले, “तृणधान्य लागवडीला जागतिक स्तरावर प्रोत्साहन मिळावे म्हणून भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला 71 देशांचा पाठिंबा मिळाला आणि 2023 हे वर्ष औपचारिकरीत्या साजरे करण्यात आले.
मात्र, तृणधान्याचा वापर केवळ एका वर्षापुरता मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांच्या तृणधान्याला सतत बाजारपेठ मिळवून देणे ही पणन मंडळाची जबाबदारी आहे.” तृणधान्य उत्पादनाला गती देण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा उपयोग करणे आणि शेतकऱ्यांना पॅकेजिंग, ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी मदत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तृणधान्याचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी केली पाहिजे, असेही ते म्हणाले. राज्यात इतर जिल्ह्यांमध्येही असे महोत्सव भरवले जाणार असून, पणन मंडळ हे उत्पादक व ग्राहक यांच्यातील पूल म्हणून काम करेल. आपल्या शेतकऱ्यांचा माल जागतिक बाजारपेठेत नेण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन त्यांनी केले.
हा तृणधान्य महोत्सव 12 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. महोत्सवात राज्याच्या विविध भागांतील तृणधान्य उत्पादक, बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व स्टार्टअप्स सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रास्ताविकात दिली. महोत्सवाच्या प्रारंभी पणनमंत्री रावल यांनी प्रदर्शनातील स्टॉल्सची पाहणी केली. तसेच, मिलेट जनजागृतीसाठी आयोजित बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
