शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासह कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा मानस
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करणे, उत्पन्नवाढीला चालना देणे, आणि उत्पादनाला संरक्षित भाव मिळवून देण्यासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व विभागांचे समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आगामी काळात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा निर्धार कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला.
ग्रामोन्नती मंडळ व कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या वतीने ९ ते १२ जानेवारी दरम्यान आयोजित ग्लोबल कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार शरद सोनवणे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, उपसंचालक श्रीधर काळे, कृषीरत्न अनिल मेहर, डॉ. प्रशांत शेटे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, माजी आमदार अतुल बेनके आदी उपस्थित होते.
ना. कोकाटे म्हणाले, “कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या तरुणांनी तांत्रिक शेती, दर्जेदार बी-बियाणे व खत उत्पादन यांसारख्या क्षेत्रांत संशोधन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. शेती व बाजारपेठ यांमध्ये साखळी निर्माण करणे आवश्यक आहे.
परवानाधारक दुकानदारांनी शेतकऱ्यांना प्रामाणिक खते व बी-बियाणे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले पाहिजे. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.” राज्यात पारंपरिक व आधुनिक पीकपद्धती यांचा समतोल साधत अनेक शेतकरी नवकल्पना राबवत आहेत.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि त्यांच्या शेतीसाठी योग्य धोरणे राबवेल. तसेच पीकविमा योजनांतील अडचणी दूर करून शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक सेवा पुरवण्यासाठी लवकरच डिजिटल ॲप विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ‘शिवनेरी हापूस आंबा लोगो’ आणि बॅसेलीस जैविक खते व जैवसंपृक्त पिके घडीपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंत्री कोकाटे यांनी स्टॉल्सना भेट देऊन प्रदर्शनाचे कौतुक केले.
कृषीरत्न अनिल मेहर यांनी शेतकऱ्यांना कमी खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी या प्रदर्शनाचे महत्त्व पटवून दिले. नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणारे प्रकल्प राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आमदार सोनवणे यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन, हमीभाव, पशुधनासाठी लसपुरवठा, दिवसा वीज उपलब्धता आदी प्रश्न सोडवून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी धोरणे राबविण्याची सूचना केली. ग्लोबल कृषी महोत्सव हे कृषी क्षेत्रातील प्रगतीचे दालन असून शेतकऱ्यांना या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञानाची माहिती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
