आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ‘एचएमपीव्ही’ विषाणू नवीन नसून तो २००१ पासून ज्ञात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. ८) ‘एचएमपीव्ही’ विषाणूविषयी आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बारामतीचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, वैद्यकीय यंत्रणांनी सज्ज राहावे आणि सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘एचएमपीव्ही’ विषाणूविषयी उपचार पद्धतीचे ओरीएंटेशन द्यावे. पुढील तीन महिन्यांसाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लँट आणि अन्य वैद्यकीय उपकरणे सुस्थितीत असल्याची खात्री करून आवश्यकतेनुसार तत्काळ दुरुस्ती करावी, असेही निर्देश देण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या तयारीबाबत माहिती देत पुणे जिल्ह्यात यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.
