अनामिक महिला आणि पुरुषावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : शहरातील एका व्यापाऱ्यास बनावट सोने देऊन १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अनामिक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील हिरालाल जैन (वय ३८) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीचे बार्शीतील तेजस हार्डवेअर आणि इलेक्ट्रिक नावाचे दुकान आहे. दिनांक ७ रोजी एक अनोळखी पुरुष आणि महिला त्यांच्या दुकानात आले. त्यांनी “माझी पत्नी आजारी आहे, दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी पैशांची गरज आहे,” असे सांगितले. आरोपींनी खऱ्या सोन्याचे दोन मणी दाखवले आणि तपासणीसाठी दिले. तपासणीत ते खरे असल्याचे स्पष्ट झाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला.
यानंतर काही वेळाने आरोपी परत आले आणि त्यांनी २ किलो वजनाच्या सोन्याच्या माळांच्या बदल्यात फिर्यादीकडून १० लाख रुपये घेतले. आरोपी निघून गेल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या माळांची तपासणी सराफाकडे केली असता ते सोने बनावट असल्याचे समोर आले. तसेच आरोपीने दिलेला मोबाइल क्रमांकही बंद आढळला.
त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी बार्शी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास फौजदार कुंजीर हे करीत आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांनी कोणत्याही व्यवहारात अधिक सतर्क राहावे, तसेच अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापूर्वी योग्य ती खात्री करावी, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
