महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : उपळाई बु येथील सुपुत्र आणि बार्शी शहरातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी धनाप्पा शेटे यांची नुकतीच बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे बार्शी तालुक्यात आणि त्यांच्या गावात आनंदाची लाट उसळली असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धनाप्पा शेटे हे शांत, शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अलीकडच्या काळात बार्शी ट्रॅफिक विभागाचे इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळली. वाहतूक व्यवस्थापनात त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी भरीव योगदान दिले.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी राबवलेल्या विविध मोहिमांचे विशेष कौतुक झाले होते. पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्यासमोर अधिक जबाबदाऱ्या येणार आहेत. स्थानिक गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, तसेच नागरिकांचा पोलीस प्रशासनावर विश्वास वाढवणे या जबाबदाऱ्या ते पेलणार आहेत.
आपली कर्तव्यनिष्ठ सेवा पुढेही चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. धनाप्पा शेटे यांची कार्यक्षमता आणि सेवाभाव बघता त्यांच्याकडून भविष्यात आणखी चांगल्या कामाची अपेक्षा बार्शी शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल उपळाई बु गावातील ग्रामस्थ, बार्शी शहरातील नागरिक, विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. धनाप्पा शेटे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची गर्दी उसळत आहे.
