युनिट चार व येरवडा पोलिसांची कारवाई : नागरीकांकडुन कौतुक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा तुरुंगातून सुटका झालेल्या मोक्यातील गुंड प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या कसबे याने समर्थकांसह लक्ष्मीनगर भागात रॅली काढून दहशत निर्माण केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत ९ जणांना अटक केली आणि त्यांच्या दहशतीला सडेतोड उत्तर दिले.
अटक केलेल्यांची आरोपींची नावे तुषार सुरेश पेठे (२०, रा. राजीव गांधीनगर, संगमवाडी), राहुल धनंजय रसाळ (१९, रा. राजीव गांधीनगर, संगमवाडी), कैलास विलास डोळस (३२, रा. परांडेनगर, धानोरी गावठाण), रोशन देवानंद पाटील (२४, रा. संगमवाडी), आशिष विजय नवगिरे (१८, रा. माणिकनगर, येरवडा), अमोल सुखदेव सरोदे (१९, रा. संगमवाडी),विशाल शंकर सिंह (२०, रा. संगमवाडी),चिराग गुरुदयाल तुसामंडा (२५, रा. संगमवाडी) अशी आहेत.
प्रफुल्ल कसबेने ज्या ठिकाणी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले होते, त्याच भागात पोलिसांनी या गुंडांच्या हातात बेड्या घालून धिंड काढली. सर्व आरोपींना एका दोरखंडाने बांधून लक्ष्मीनगरच्या मुख्य रस्त्यावरून फिरवण्यात आले.
या घटनेने दोन दिवसांपूर्वी लोकांना धमकावत दहशत माजवणाऱ्या गुंडांचेच चेहर्यावर भीती दिसत होती. राज चौकात उभारलेल्या तात्पुरत्या तपास मदत केंद्रात गुंडांना पोलिसांनी त्यांच्या खास गाण्यांवर नाचवले. मानपानाचा हा उपरोधिक कार्यक्रम संपल्यावर आरोपींना बुरखा घालून लक्ष्मीनगर व आसपासच्या भागात पायी फिरवण्यात आले.
पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, युनिट चारचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि गुन्हे शाखा व येरवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते.
गुंड टोळ्यांच्या दहशतीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी हा नवा पॅटर्न तयार केला असून अशा प्रकारची गुंडगिरी करणाऱ्या टोळ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.पुणे पोलीसांनी इतर भागात देखील अशा प्रकारे कारवाई केली,तर दहशत मुक्त पुणे होण्यास फार वेळ लागणार नाही.
अनाधिकृत फलकांवर करावी कारवाई…
काही वर्षापूर्वी अप्पर भागातील गुंडाची दहशत मोडून काढण्यासाठी तत्कालीन सहाय्यक पोलीस उपायुक्त शिवाजीराव पवार यांनी या संपूर्ण भागात अनाधिकृत फलक लावणाऱ्या सर्व भाईचे बँनर त्याच भाईला काढण्यास भाग पाडले.
तसेच ज्यांचे फोटो व नाव त्या फलकावर आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले व त्यांना पोलिसी खाक्या देखील दाखवला.या सिंगम अधिकार्यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे ते जो पर्यंत स्वारगेट Acp होते तो पर्यंत संपूर्ण बिबवेवाडी परिसर हा गुंडाच्या दहशत पसरवणाऱ्या फलकापासून दूर होता.त्यामुळे या भागातील अनेक नवीन भाई त्यावेळी उदयास आले नाही.
