वारजे माळवाडी पोलीसांची दमदार कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांनी दीर्घ तपासानंतर पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगार अभिजीत उर्फ चोख्या तुकाराम येळवंडे याला लोणावळ्यातून अटक केली आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या या आरोपीविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई झाली होती.
अभिजीत उर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय २४ वर्षे, रा. जाधव चाळ, काकडे पॅलेस समोर, कर्वेनगर, पुणे) याने ५ जून २०२१ रोजी रविंद्र तागुंदे याच्यावर जीवघेणा गोळीबार केला होता. त्याच्यासोबत आणखी तीन आरोपी होते. याप्रकरणी ६ जून २०२१ रोजी त्याला अटक करण्यात आली आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
पुढील कारावासात तो येरवडा मध्यवर्ती कारागृहात होता, मात्र २१ नोव्हेंबर २०२३ रोजी जामिनावर सुटल्यानंतर त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल झाला. त्याचे धोकादायक कृत्ये पाहता पोलीस उप-आयुक्त, परि-३, पुणे शहर संभाजी कदम यांनी त्याला २८ ऑगस्ट २०२४ रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते.
तडीपार असतानाही त्याने विनापरवाना शहरात प्रवेश केला. त्याविरोधात विविध कायद्याखाली गुन्हा नोंदवून स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला गेला. पोलीस आयुक्त पुणे अमितेशकुमार यांनी ४ डिसेंबर २०२४ पासून एक वर्षासाठी त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र, तो अदृश्य राहिला होता.
पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, अंमलदार योगेश वाघ, शरद पोळ यांनी लोणावळा परिसरात सखोल शोध घेतला. ९ जानेवारी २०२५ रोजी आरोपीला अत्यंत चतुराईने ताब्यात घेतले व नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले.
या यशस्वी कामगिरीसाठी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग, प्रविण पाटील, पोलीस उप आयुक्त, परि-३, संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, भाऊसाहेब पठारे, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, साळुंखे, तसेच पोलीस अंमलदार योगेश वाघ, शरद पोळ, सागर कुंभार, प्रशांत चव्हाण, रियाज शेख, विजय खिलारी आणि किरण तळेकर यांनी परिश्रम घेतले.
