दुचाकीने पेट घेतल्याने आगीचा प्रसार, अग्निशमन दलाने तत्काळ नियंत्रण मिळवले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम रोडवरील नताशा एन्क्लेव्ह या चार मजली इमारतीत सोमवारी पहाटे आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सोमवारी (दि. १३) पहाटे सव्वातीनच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावर उभी असलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतल्यामुळे आग भडकली. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील घरगुती वस्तूंना आगीचा फटका बसला. आग झपाट्याने पसरत असतानाच कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करत १० ते १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आगीच्या वेळी इमारतीतील रहिवासी सुरक्षित बाहेर पडले होते. जवानांनी इमारतीत अडकलेले कोणी नसल्याची खात्री करून संभाव्य दुर्घटनेला आळा घातला. विशेष म्हणजे, एका घरातील गॅस सिलिंडरमधून गळती सुरू होती. जवानांनी वेळीच सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सदर घटनेत तळमजल्यावर असलेले सलूनचे दुकानही सुरक्षित राहिले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या कामगिरीत कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, वाहनचालक दीपक कचरे, तसेच तांडेल नीलेश लोणकर, जवान मोहन सणस, सागर नेवगे, अनुराग पाटील, आणि रामराज बागल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांची तत्परता आणि सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.
