बाणेरमधील हॉटेलमधील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबईहून पुण्यात येऊन एका पतीने पत्नीसह हॉटेलमध्ये मुक्काम केला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी वाद झाल्याने पतीने चाकूने पत्नीवर वार करून खूनाचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःच्याही गळ्यावर व पोटावर चाकू खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला.
अमजद युसुफ मुल्ला (वय ३९, रा. विष्णुनगर, चेंबूर, मुंबई) असे पतीचे नाव आहे, तर पत्नी नसिमा मुल्ला याही गंभीर जखमी असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात हॉटेल ग्रॅव्हीटी इनचे व्यवस्थापक गणेश कचरु लंके (वय ३६) यांनी फिर्याद दिली.
घटना बाणेर येथील ग्रॅव्हीटी इन हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमजद मुल्ला आणि नसिमा मुल्ला हे पती-पत्नी आहेत. दोघांमध्ये वाद झाल्याने नसिमा या पुण्यात येऊन राहायला आल्या होत्या. अमजद मुल्ला हे मुंबईहून पुण्यात आले आणि हॉटेल ग्रॅव्हीटी इनमधील रूम नंबर १०७ मध्ये उतरले.
सकाळी वाद झाल्यानंतर अमजदने चाकूने नसिमा यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व छातीवर वार केले. त्यानंतर त्याच चाकूने स्वतःच्याही गळ्यावर व पोटावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेचा आरडाओरडा ऐकून हॉटेलमधील कर्मचारी धावत आले.
त्यांनी रूममध्ये जाऊन दोघांना जखमी अवस्थेत पाहिले आणि तत्काळ पोलिसांना कळविले. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमजद मुल्ला याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण करत आहेत.
