बनावट कागदपत्रांसह १० वर्षे बेकायदा वास्तव्य; पोलिसांकडून सापळा रचून अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे, ता. १७: स्वारगेट परिसरातील महर्षीनगर भागात दहा वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली.
एहसान हाफीज शेख (वय ३४, सध्या रा. महर्षीनगर, गुलटेकडी, मूळ रा. बांगलादेश) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र, आणि मतदार ओळखपत्र जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम आणि बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एहसान शेख याचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. २०१४ मध्ये भारतात बेकायदा प्रवेश केल्यानंतर त्याने स्वारगेट परिसरात व्यवसाय सुरू केला. त्याच्याविरोधात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महर्षीनगर परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान एहसानकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र आणि मतदार ओळखपत्र जप्त करण्यात आले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळवली आणि ती तयार करण्यात कोणाचा सहभाग होता, याचा तपास सुरू आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील करीत आहेत.
पोलिसांनी घुसखोरांविरोधात कारवाईसाठी प्रयत्न वाढवले आहेत. बेकायदा नागरिकांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
