लोणी काळभोरमधील घटनेत ६ वर्षांनी न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उसने दिलेले पैसे मागितल्यावरून झालेल्या वादात दगड व काठीने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने सात वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.
शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव भिमराव यशवंत खांडे (वय ५५, रा. वडकी) असून, खून झालेल्या व्यक्तीचे नाव चंद्रकांत शंकर चव्हाण आहे. ही घटना १७ एप्रिल २०१९ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वडकी येथे घडली होती. उसने दिलेल्या पैशांची मागणी केल्याने भिमराव खांडे याने दगड व लाकडी काठीने चंद्रकांत चव्हाण यांचा खून केला होता.
सहायक पोलीस निरीक्षक दिलीप कुमार यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी न्यायालयात कामकाज पाहिले, तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून ललिता कानवडे यांनी सहाय्य केले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीला ग्राह्य धरून न्यायालयाने भिमराव खांडे याला सात वर्षे सश्रम कारावासाची आणि १० हजार रुपये दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.
परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल कोर्ट पैरवी अधिकारी ललिता कानवडे, समन्स वॉरंट अंमलदार प्रशांत कळसकर, केस दत्तक अंमलदार रेश्मा कांबळे आणि तपास अधिकारी दिलीप पवार यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
