महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी घेतला मोठा निर्णय
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या मिळकत कर वसुलीसाठी पुणे महापालिकेकडून नियोजन सुरू आहे. मोबाइल टॉवर कंपन्यांकडे असलेली थकबाकी वसुलीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
मोबाइल टॉवर असलेल्या कंपन्यांकडे महापालिकेची ३५०० कोटी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारने सक्तीची वसुली थांबवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे ही थकबाकी कशी वसूल करावी, असा पेच महापालिकेपुढे निर्माण झाला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारीवर्गाने राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेण्याचे ठरवले आहे.
महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकानुसार मिळकत कर विभागाला २७०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, ज्यापैकी १७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा करण्यात यश आले आहे. उर्वरित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप म्हणाले, “शहरात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. मोबाइल कंपन्यांकडे सुमारे ३५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल होणे महत्त्वाचे असून, यासाठी राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी याबाबत चर्चा करून पुढील पावले उचलली जातील.”
