४४ दुचाकींवर ३ लाख ९८ हजारांचा दंड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) बार्शी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाई करीत आहे. या मोहिमेदरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४४ दुचाकींवर एकूण ३ लाख ९८ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
शनिवार, १८ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवर तपासणी करण्यात आली. या कारवाईत हेल्मेट न वापरणे, ट्रिपल सीट प्रवास, विमा नसणे, वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे, विनापरवाना वाहन चालवणे, १५ वर्षांहून जुनी तसेच पासिंग नसलेली वाहने यांसारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, अमरसिंह गवारे आणि आसिफ मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली.
मोटार वाहन निरीक्षक प्रदीप बनसोडे, सहाय्यक निरीक्षक चैतन्य गावडे, आभिजीत कांडगे, आणि चालक पवन सरवदे व प्रफुल्ल पंडित यांनी दंडात्मक कारवाईत सहभाग घेतला.
वाहतूक नियमांचे पालन न केल्यास भविष्यात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरटीओने दिला आहे. पासिंग प्रक्रिया किंवा अन्य समस्यांसाठी वाहनचालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
लर्निंग आणि ड्रायव्हिंग लायसन्स तपासणीसाठी प्रत्येक गुरुवारी जामगाव रोडवरील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी साप्ताहिक शिबिर आयोजित केले जाते. १८ वर्षांवरील युवक-युवतींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
