घरमालक राहतोय भाड्याच्या घरात, भाडेकरार करुन घेतला घराचा ताबा
महारष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घरावर कर्ज काढून देतो, असे सांगून घराची कागदपत्रे घेऊन कर्ज न काढता, घर खरेदी करण्याचा बहाणा करून इसारपावती घेत ११ महिन्यांचा भाडेकरार करून घराचा ताबा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अंकुश हनुमंत पवार (वय ३३, रा. रामनगर, रामटेकडी, वानवडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी नितीन अशोक गायकवाड (वय २९, रा. संकेत विहार, स्वराज्यनगर, फुरसुंगी) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार संकेत विहार येथे ३ एप्रिल २०२२ पासून १८ जानेवारी २०२५ दरम्यान घडला आहे. घरमालक असलेले फिर्यादी सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाहनचालक म्हणून काम करतात.
त्यांचे संकेत विहार येथे घर आहे. सध्या ते रामटेकडी येथे भाड्याच्या घरात राहतात. आरोपी नितीन गायकवाड यांनी अंकुश पवार यांना “तुमच्या घरावर बँकेकडून कर्ज काढून देतो,” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
घराची कागदपत्रे घेतली; मात्र कर्ज काढून न देता, “तुमचे घर मी खरेदी करतो,” असा बहाणा केला. त्यासाठी दोन वेळा इसारपावती तयार केली आणि ११ महिन्यांचा भाडेकरार करून त्या घरात राहत आहेत. इसारपावतीमध्ये ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण न करता घराचा ताबा घेऊन फिर्यादीची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे तपास करत आहेत.















