बिबवेवाडीतील घटना : बियर बारमधील ७ जणांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिल देण्यावरून झालेल्या वादात बियर बारमधील कर्मचार्यांनी तिघांना कोंडून त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि बांबूने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी बारमधील सात कर्मचार्यांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
या हल्ल्यात ओमकार रवींद्र आंधळकर (वय २६, रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी), गजानन शिवाजी खुडे (वय ४०) आणि अजय धनंजय नाईक (वय २५, रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत ओमकार आंधळकर यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये इजाज अहमद जहाँअली मुल्ला (वय २९), सुरेबुल इस्मान शेख (वय २२), अश्रुउद्दीन उस्मान शेख (वय २२), तुहीन रुपचाट शेख (वय २०), बिशाल जगस बडगी (वय २०), शिरयत फजुल मंडल (वय २१) आणि सम्राट शिराजुल इस्लाम (वय २३, सर्व रा. पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. एस के बारचा मालक कॅप्टन प्रदीप ठोंबरे आणि इतर २-३ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ जानेवारी रोजी मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रोडवरील एस के बारमध्ये ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी ओमकार आंधळकर आणि त्यांचे मित्र बियर पित बसले होते.
बिल भरण्यावरून झालेल्या वादात कर्मचार्यांनी त्यांना बारच्या आत २० ते २५ मिनिटे कोंडून ठेवले. यावेळी लाथाबुक्क्यांनी आणि बांबूने मारहाण करत त्यांच्या पोटावर, डोक्यावर आणि कपाळावर गंभीर जखमा केल्या.
या घटनेनंतर बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सात जणांना अटक केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे करत आहेत.
