खराडीमधील पहाटेची घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घरगुती भांडणातून पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे.
ज्योती शिवदास गीते (वय २८, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) याला अटक केली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे साडेचार च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदास गीते हा मूळचा बीडचा रहिवासी आहे. तो तुळजाभवानी नगर येथे भाड्याने राहतो. शिवदास न्यायालयातील स्टेनोने म्हणून नोकरी करतो. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वारंवार भांडणे होत असत.
बुधवारी पहाटे दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. या वादाच्या वेळी शिवदास याने कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात ज्योतीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली.
चंदननगर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शिवदास गीते याला ताब्यात घेतले. ज्योतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. चंदननगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

















