आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भारतीय अटॅन्स तोफ युद्धात ठरणार गेमचेंजर

Spread the love

पुणे : डीआरडीओने विकसित केलेल्या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या अटॅन्स तोफ लवकरच भारतीय लष्करात सामील होणार आहे. भारत फोर्ज या कंपनीने या तोफेची निर्मिती केली आहे. भारतीय सेनेसाठी बोफोर्सप्रमाणेच ही तोफ युद्धात गेमचेंजर ठरणार आहे.

नाशिक येथील देवळाली तोफखाना प्रशिक्षण केंद्रात वार्षिक युद्ध सरावाच्या कार्यक्रमात अटॅन्स तोफ सादर करण्यात आली. भारतीय लष्कराकडून वापरल्या जाणाऱ्या बोफोर्स, धनुष्य, कोरियन बनावटीची के-९ वज्र आणि इंडियन फील्ड गन या तोफांचे प्रात्यक्षिकही या शस्त्र प्रदर्शनात दाखवण्यात आले.

अटॅन्स तोफेचे डिझाईन डीआरडीओ, टाटा पॉवर एसईड, आणि भारत फोर्ज यांनी २०१३ ते २०१७ दरम्यान विकसित केले आहे. १८ टन वजनाच्या या तोफेचे कॅलिबर १५५ मिमी आहे.

कारगिल युद्धात बोफोर्स तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, अटॅन्स तोफ अधिक अत्याधुनिक असून लक्ष्यावर अचूक मारा करणारी आहे. या तोफेची मारक क्षमता ४८ किलोमीटर आहे, जी बोफोर्सच्या ३८ किलोमीटरच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे.

ही स्वयंचलित तोफ एका मिनिटात ५ राऊंड फायर करू शकते, अडीच मिनिटांत १० राऊंड फायर करते आणि एका तासात ६० राऊंड फायर करण्याची क्षमता बाळगते. त्याचबरोबर अडीच मिनिटांत ती क्लोज होऊन दुसऱ्या ठिकाणावरून फायरिंगसाठी सज्ज होते.

या तोफेच्या चाचण्या सिक्कीम, बालासोर आणि पोखरण येथे यशस्वीरीत्या घेण्यात आल्या आहेत. अर्मेनिया लष्कराला १२ अटॅन्स तोफ पुरवण्यात आल्या आहेत. भारतीय लष्करातही ती लवकरच सामील होणार आहे.

अतिशय अचूक आणि उच्च क्षमतेच्या अटॅन्स तोफेमुळे भारतीय लष्कराच्या युद्धकौशल्याला मोठी चालना मिळणार आहे.