मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त विज्ञान प्रदर्शन संपन्न
बार्शी येथे विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे २० व २१ जानेवारी २०२५ रोजी डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी ए. पी. देबडवार, माजी सचिव व्ही. एस. पाटील आणि प्रा. उषा गव्हाणे यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण बार्शी नगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, प्रा. सुनील विभुते आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. मीराताई यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रदर्शनात विविध गटांत ५३ प्रयोग सादर करण्यात आले. प्राथमिक गटात स्वरूप राक्षे व राघवेंद्र साखरे (शिशु संस्कार केंद्र, बार्शी) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. उच्च प्राथमिक गटात श्रेयस गरड व केदार पाटील (लोकसेवा विद्यालय, आगळगाव), माध्यमिक गटात तनवीर तांबोळी (महाराष्ट्र विद्यालय, बार्शी), उच्च माध्यमिक गटात सुशांत जमले व सक्षम कचरे (जनता विद्यालय, येडशी) आणि महाविद्यालयीन गटात पूजा जोगदंड व प्राची जगताप (कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शिक्षक गटात संदीप पालके (जयहिंद विद्यालय, कसबे तडवळे) यांनी बाजी मारली.
या प्रदर्शनाचे परीक्षण प्रा. उषा गव्हाणे, डॉ. विष्णू शिखरे, एस. के. चौधरी, विलास मांजरे, प्रताप दराडे, अमोल बारकुल आणि नरेंद्र पवार यांनी केले. विज्ञान विभाग प्रमुख एस. एम. हाजगुडे व त्यांच्या टीमने या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. विजेत्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव पी. टी. पाटील व इतर सदस्यांनी केले.
