कोरेगाव पार्कमध्ये ६७ लाख : तर लोणी काळभोरमध्ये १६ लाखांचे अंमली पदार्थ जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ड्रग्ज फ्री पुणे मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. कोरेगाव पार्क आणि लोणी काळभोर येथे करण्यात आलेल्या कारवाईत ४० किलो गांजा, ओजी कुश गांजा तसेच कोकेनसह महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
कोरेगाव पार्क येथील कारवाईत प्रणव नवीन रामनानी (वय १९, रा. बंडगार्डन) आणि गौरव मनोज दोडेजा (वय १९, रा. कोरेगाव पार्क) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशानुसार, शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवून अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाने २३ जानेवारी रोजी कोरेगाव पार्क परिसरात पेट्रोलिंग केले.
या दरम्यान, पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे क्लोअर गार्डन सोसायटी येथे दोघा तरुणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या ऐवजात १३ लाख ६६ हजार ४०० रुपयांचा १३६ ग्रॅम ओजी कुश (हायड्रोपोनिक) गांजा, ६९ हजार ५०० रुपयांचा २ ग्रॅम ७८ मिलीग्रॅम कोकेन, २ लाख ७० हजार रुपयांचे ४ मोबाईल फोन आणि ५० लाख रुपयांच्या दोन कार यांचा समावेश आहे.
या सर्वांची एकूण किंमत ६७ लाख रुपये आहे. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे लोणकर वस्ती येथील सार्वजनिक रस्त्यावर भरतकुमार दानाजी राजपुरोहित (वय ३५) आणि आशुसिंग गुमानसिंग (दोघे रा. जालोर, राजस्थान) यांना पकडले.
त्यांच्याकडून १६ लाख ६७ हजार ८०० रुपयांचा ऐवज, ज्यामध्ये ४० किलो ३९० ग्रॅम गांजाचा समावेश आहे, जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, अनिल जाधव, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, योगेश मांढरे, युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, आझाद पाटील, साहिल शेख, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, सुनील नागलोट, प्रदीप गाडे, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, सचिन माळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, विनायक साळवे, योगेश मोहिते, रेहाना शेख आणि नुतन वारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
