नवी मुंबईतून आवळल्या मुसक्या, अविवाहित असल्याचे भासवून केली १० लाखांची फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पहिले लग्न झालेले असूनही जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे खोटे भासवून डॉक्टर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात १० लाख रुपये घेतल्यानंतर आपले लग्न झाले असल्याचे आणि पत्नी गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. या मानसिक धक्क्यामुळे डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. या घटनेनंतर फरार झालेल्या संशयिताला नवी मुंबईतून अटक करण्यात आली.
डॉ. कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३०, रा. शंकर कॉलनी, जत, जि. सांगली) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोपट फडतरे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, डॉ. कुलदीप सावंत याने आपले पहिले लग्न झालेले असतानाही जीवनसाथी डॉट कॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून लग्नासाठी नाव नोंदवले.
या नोंदणीच्या आधारे फिर्यादी यांनी त्याची वैयक्तिकरित्या भेट घेतली. मात्र, त्याचे वागणे आणि दवाखान्याबाबत गैरसमज निर्माण झाल्याने त्यांनी नकार दिला.त्यानंतर कुलदीप सावंत याने फिर्यादींच्या मुलीशी, पल्लवी पोपट फडतरे (वय २५), संपर्क साधला. स्वतःला अविवाहित असल्याचे भासवून तिच्याशी मैत्री केली.
लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याकडून १० लाख रुपयांची रक्कम घेतली व परत न करता फसवणूक केली. त्यानंतर पल्लवीला त्याचे पहिले लग्न झाल्याचे आणि पत्नी गर्भवती असल्याचे समजले. या धक्क्यामुळे पल्लवीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
या घटनेनंतर कुलदीप सावंत फरार झाला होता. पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव आणि त्यांच्या टीमला तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुलदीप सावंत नवी मुंबईतील दिघा येथे येणार आहे.
या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव, सहायक पोलीस फौजदार सोमनाथ सुतार, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व अजय कामठे यांनी दोन दिवस नवी मुंबईत तळ ठोकून संशयिताला दिघा येथून ताब्यात घेतले आणि अटक केली.
ही कामगिरी करणारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव, सहायक पोलीस फौजदार सोमनाथ सुतार, पोलीस हवालदार निलेश खोमणे, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, अजय कामठे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले व प्रणय पाटील यांनी कामगिरी पार पाडली.
















