१६७ कोटींचा दंड : १०४ कोटींची थकबाकी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. शहरातील रस्त्यांवरील अडथळे दूर करून वाहतुकीचा वेग वाढविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. मात्र, दरवर्षी तब्बल १० लाख पुणेकर वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यात येतो.
दरवर्षी नियमभंग करणाऱ्यांकडून दंड वसुल करण्यासाठी पोलीस विशेष मोहिमा राबवतात. लोक अदालतीमार्फत दंड वसुल करण्याचा प्रयत्न केला जातो, तरीही ५० टक्क्यांहून अधिक वाहनचालक न्यायालयीन नोटिसांकडे दुर्लक्ष करतात.
गेल्या दोन वर्षांत ११ लाख वाहनचालकांकडे वाहतूक दंडाच्या स्वरूपात तब्बल १०४ कोटी रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने २०२३ आणि २०२४ मध्ये वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यात आला आहे. २०२३ मध्ये १० लाख ११७ वाहनांवर ७७ कोटी ५६ लाख ९६ हजार २५० रुपये दंड ठोठावला गेला, तर २०२४ मध्ये १० लाख ६३ हजार ४७६ वाहनांवर ८९ कोटी ९१ लाख ३ हजार ५५० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
दोन वर्षांत एकूण १६७ कोटी ४७ लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला असून, त्यापैकी केवळ ६३ कोटी ४५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. शहरातील वाहनचालकांमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालविणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे आणि दुचाकीला आरसा नसणे यांसारख्या नियमभंगाचे प्रमाण जास्त आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे अशा प्रकरणांवर कारवाई केली जाते. नियमभंगाची पावती वाहन मालकाच्या मोबाईलवर पाठवली जाते, मात्र अनेक वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे थकीत दंडाची रक्कम सतत वाढत आहे.
वाहतूक शाखेने २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, ट्रिपल सीट आणि रॅश ड्रायव्हिंग यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे.
वाहतूक नियमांचे पालन आणि थकीत दंड वसुलीसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. नियमभंग थांबविण्यासाठी जनजागृतीदेखील गरजेची आहे.
