१० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील टोळीला अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने बनावट सोने विकणाऱ्या राजस्थानस्थित परराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीने १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून दोन किलो बनावट सोने जप्त करण्यात आले आहे.
फिर्यादी स्वप्निल हिरालाल जैन (वय ३८, रा. अनंत निवास, स्वामी समर्थ मंदिराजवळ, पंकज नगर, बार्शी) यांच्या वडिलांना, दि. ७ जानेवारी २०२५ रोजी, एक अज्ञात पुरुष व महिला दुकानात भेटले. त्यांनी पत्नी आजारी असल्याचे सांगून सोन्याचा मणी गहाण ठेवण्याचा प्रस्ताव दिला.
दोन दिवसांनी (दि. ९ जानेवारी २०२५) त्यांनी दोन सोन्याचे मणी आणले, जे तपासल्यानंतर खरे असल्याचे आढळले. त्यामुळे फिर्यादीने १० लाख रुपये देऊन २ किलो सोन्याच्या मण्यांची माळ विकत घेतली. मात्र, ती माळ खोटी असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने बार्शी पोलिसांत तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बारामती एसटी स्टॅन्ड येथे सापळा रचला. यामध्ये आरोपी श्रवणकुमार जेठाराम राठोड (वय ४०) , नंदुकुमार धन्नाराम बाघरी (वय ३७) , श्रवणकुमार विराराम वाघरी (वय ३१) या राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आले.
या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, आणि बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
तपास पथकामध्ये पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, सपोनि समीर ढोरे, पोसई महेश गळगटे, मपोसई सोनम जगताप आणि बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी पो उप-निरीक्षक उमाकांत कुंजीर, सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ श्रीमंत खराडे, बाळकृष्ण दबडे, बाबासाहेब घाडगे, महिला पोहेका शारदा सानप, पोना संगप्पा मुळे, पोकॉ अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, सचिन देशमुख, राहुल उदार, सचिन नितनात, अवि पवार, प्रल्हाद अकुलवार, इसामियाँ बहिरे तसेच रतन जाधव सायबर पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण यांचा समावेश होता.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत. या यशस्वी कारवाईमुळे बार्शी पोलिसांनी बनावट सोने विकणाऱ्या टोळीच्या कारवायांना आळा घालण्यास मोठे योगदान दिले आहे. नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
