आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘त्या’ अ‍ॅपवर ओळख वाढवून लुटणारी टोळी जेरबंद

Spread the love

पुणे : डीएसके रोड ते रायकर मळा दरम्यान गाड्या अडवून लुटणाऱ्या टोळीचा नवा प्रकार समोर आला आहे. “माझ्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे,” असे सांगून गाड्यांवर बसणाऱ्या तरुणांना निर्जन स्थळी नेऊन लुटणारी ही टोळी कार्यरत होती. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका संदेशाच्या आधारे नांदेड सिटी पोलिसांनी चौघांना जेरबंद केले.

या टोळीचा प्रमुख हेतू समलैंगिक डेटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ग्रॅन्डर’ अ‍ॅपद्वारे ओळखी वाढवणे व लुटमारी करणे हा होता. टोळीने आपली ओळख गुप्त ठेवण्यासाठी बळी पडलेल्यांची बदनामी होईल, अशी भिती निर्माण केली होती. परिणामी, बळी पडलेले लोक पोलिसांत तक्रार देण्यास टाळाटाळ करत होते.

मात्र, एका व्यक्तीने सावधतेसाठी सोशल मीडियावर मेसेज पोस्ट केला. या संदेशाच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून या टोळीचा पर्दाफाश केला. नांदेड सिटी पोलिस ठाण्यात एका ३२ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. १४ जानेवारीला सायंकाळी डीएसके विश्व परिसरात हा प्रकार घडला.

फिर्यादीने ‘ग्रॅन्डर’ अ‍ॅपद्वारे एका व्यक्तीशी संवाद साधला होता. त्या व्यक्तीने फिर्यादीला डीएसके विश्व येथील कमानीजवळ बोलावले. तेथे पोहोचल्यावर संबंधित व्यक्तीने त्यांना दुचाकीवर बसवून शाळेमागील निर्जन स्थळी नेले.

त्यानंतर, तिघेजण अचानक येऊन फिर्यादीला शिवीगाळ करत पैसे, मोबाईल आणि कानातील सोन्याच्या बाळ्या काढून घेण्यास भाग पाडले. त्यांनी विरोध केल्यावर शस्त्राचा धाक दाखवत गुगल पेचा पासवर्ड मिळवून बँक खात्यातून ५,००० रुपये ट्रान्सफर केले. एकूण २४,५०० रुपयांचा ऐवज लुटल्यानंतर आरोपी फरार झाले.

घटनेमुळे घाबरलेल्या फिर्यादीने सुरुवातीला तक्रार नोंदवली नाही. मात्र, मित्र व पोलिसांच्या धीर दिल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे फिर्याद नोंदवली. या प्रकरणी भारत किसन धिंडले (वय १८, रा. मुक्ताई हाईट्स, धायरी) याला अटक करण्यात आली असून, तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त बापूरसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुणगे, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, राजू वेंगरे, अक्षय जाधव, प्रशांत काकडे, मोहन मिसाळ आदींचा समावेश होता.
पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील संशयास्पद मेसेजेसकडे लक्ष देण्याचे व सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.