सीसीटीव्हीवरून लागला हाताला : आंतरराज्य सराईत घरफोड्या जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भोर : भोर शहरातील मध्यवर्ती श्रीपतीनगर येथे एका रात्रीत चार घरांमधून ९ लाख रुपये , १८ तोळे सोने, २ किलो ७०० ग्रॅम चांदी असा २६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून आंतरराज्य घरफोड्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, २ किलो चांदीची भांडी, रोख रक्कम आणि कार असा एकूण १६ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आरोपी लखन कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने (वय ३१, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे आहे. त्याच्यावर गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये घरफोडीचे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याने कर्नाटकात चोरी केल्याप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा भोगलेली आहे.
भोर पोलीस स्टेशनमध्ये माधव पुरोहित (वय ६४, रा. श्रीपतीनगर, भोर) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. पुरोहित कुटुंब पुण्यात मुलाकडे गेल्यानंतर त्यांच्या घरासह शेजारील तीन घरे फोडण्यात आली. या घटनेने भोर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासून एका संशयास्पद व्यक्तीची माहिती मिळाली. या व्यक्तीची ओळख लखन कुलकर्णी उर्फ सचिन माने अशी पटली. त्याला अटक करण्यासाठी पथक मंगळवेढा येथे पोहोचले.
२४ जानेवारी रोजी शिरवळकडून पुण्याकडे जात असताना ससेवाडी परिसरात त्याला अटक करण्यात आली. चोरीस गेलेल्या ऐवजामुळे आयुष्यभराची पुंजी गमावल्याची खंत माधव पुरोहित यांनी व्यक्त केली होती. गुन्हा उघडकीस आल्याने श्रीपतीनगरमधील चारही कुटुंबीयांसह भोर शहरातील ग्रामस्थांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते आणि पोलीस अंमलदार बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, मंगेश भगत, महेश बनकर, मंगेश थिगळे, विजय कांचन, धीरज जाधव, अजित भुजबळ, काशिनाथ राजापूरे, केतन खांडे, अतुल मोरे यांनी केली.