सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून खून : कोंढव्यातील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दारू पिताना झालेल्या वादातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून त्याचा खून केला. ही घटना कोंढव्यातील भैरवनाथ मंदिरासमोरील दशक्रिया विधीधाम येथे सोमवारी दुपारी घडली. काही तासांतच कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
बारिश ऊर्फ बार्या संजय खुडे (वय २१, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, तालीम चौक, कोंढवा) आणि आकाश सुभाष मानकर (वय २३, रा. आर. के. कॉलनी, गोकुळनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, मल्लेश कुपिंद्र कोळी (वय ३२, रा. आर. के. कॉलनी, गोकुळनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार रणजित शिंदे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लेश कोळी, खुडे आणि मानकर हे तिघेही मित्र असून, कोणतेही कामधंदा करत नव्हते. सोमवारी दुपारी भैरवनाथ मंदिरासमोरील दशक्रिया विधीधाम येथे दारू पिताना त्यांच्यात वाद झाला.
वाद विकोपाला गेल्याने खुडे आणि मानकर यांनी मल्लेश कोळी यांच्यावर लाकडी दांडक्याने आणि सिमेंट ब्लॉकने हल्ला केला. या हल्ल्यात मल्लेश कोळी गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. नागरिकांनी जखमी अवस्थेत तरुण पडल्याची माहिती पोलिसांना कळवली.
कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिसरातील चौकशीद्वारे मल्लेश कोळी यांची ओळख पटली. दोघे मित्र घटनेदरम्यान त्यांच्या सोबत असल्याचे समजताच पोलिसांनी काही तासांतच बारिश खुडे आणि आकाश मानकर यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे करीत आहेत.